रविवार, २९ नोव्हेंबर, २०१५

प्रत्येक पालकाने व शिक्षकाने वाचावाच असा लेख

प्रत्येक पालकाने व शिक्षकाने वाचावाच असा लेख 📝
9nathpawar.blogspot.in
[वाचायला शिकण्याबाबतची टिप्पणी आणि छापील शब्दाला भिडणे - रोझेन कॉनी आणि हॅरॉल्ड]

🙏🏻 सांराशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट करिता)

 🌟 प्रस्तुत उतारा ‘प्राथमिक शाळांमधील मुलांची भाषा’ या पेंग्विन बुक्सच्या पुस्तकातून घेतला आहे. १९७३ रोझेन कॉनी आणि हॅरॉल्ड यांनी हे पुस्तक लिहिले.

 📝 साक्षर होणे :

🙇 जोझ सगळ्यात नापास झाला. पाच वर्षे शासकीय शाळेत जाऊनही, ना त्याला वाचता येत होते, ना गणिते सोडवता येत होती. त्याला अगदी आरंभीच्या इतिहास भूगोलातल्या साध्या साध्या गोष्टीही येत नव्हत्या. त्याच्याबद्दल आम्हाला सांगताना असे वर्णन केले गेले – ‘शिकायची इच्छाच नाही, वाचन कौशल्ये नाहीत, वाचनात अडचणी आहेत.’

 🎏 जोझला आणि त्याच्या पाठ्यपुस्तकांना कोणी एकत्र आणले ? हे एकत्र कसे आले यामध्ये तर त्याच्या वाचनातल्या अडचणींची मुळे नाहीत ना ?

📔 पुस्तक आपल्याला त्याला कोण सांगते ? कोणीतरी सांगते. कशासाठी ? आणि सांगताना त्यात आस्था असते का ? त्याला वाचायला यावे अशी इच्छा सांगणार्‍याच्या आवाजात आवाजात उमटते का ?

📕 आणि पुस्तक कोणी लिहिले ? कशासाठी ? मुळात ते जोझसाठी लिहिले गेले का ? जोझ त्या पुस्तकातल्या जगाचा भाग आहे का ? वाचता येत नाही म्हणून जोझ जेव्हा नुसता बसून असतो तेव्हा तो नक्की काय करतो ? तो काय करतो, कसला विचार करतो हे शिक्षक त्याला विचारतात का ? की शिक्षकांनी हे न विचारणेही, जोझला वाचता येत नसण्याचाच, एक भाग आहे ?

👼 ‘वाचन कसे शिकवावे?’ याचा तपशिलात जाऊन केलेला हा अभ्यास नव्हे. वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या वेळची निरिक्षणे, तिथल्या शिक्षकांनी झालेले बोलणे यामधून काही मुद्दे नोंदावेसे वाटले. भाषाविकास म्हणजे वाचायला शिकवणे असे सहजपणे समजले जाऊ लागले आहे अशा काळात, अशी नोंद करणे महत्त्वाचे वाटले.

👫 मुलांनी सांगितलेल्या शब्दांवरून, वाक्यांवरून, मजकुरावरूनच पूर्णपणे वाचन शिकवणार्‍या शाळांकडून मला खूप काही शिकता आले. मात्र बर्‍याच शाळांमध्ये क्रमिक पुस्तकांवरूनच शिकवले जाते. मुलांच्या बोलण्यातील आशयावरून शिकवायचे, तर क्रमिक पुस्तकातला काही भाग वगळावा लागतो आणि तो वगळायचा, तर शिक्षकाकडे खूप धैर्य आणि आत्मविश्वास असायला हवा.

👻 बोललेला शब्द आणि लिखित शब्द यात अंतर असते. मूल जर प्रमाणभाषा बोलत नसेल, एखादी बोली बोलत असेल, तर हे अंतर आणखी वाढते, आणि वाचन शिकणे आणखी अवघड होते. अशा परिस्थितीत मुलानेच सांगितलेला मजकूर लिपिबद्ध करण्याने या अडचणीचे प्रमाण कमी होते कारण बोललेल्याचा लिहिलेल्याशी संबंध जोडला जातो. आपणच बोलते ते कागदावर उतरलेले मुलांना दिसते.

🎃 आशय जरी क्रमिक पुस्तकांमधला असता, तरी त्यातील शब्द गाभ्याशी मानून, मुलांनी ते स्वतःच्या वाक्यांत वापरावे यासाठी शिक्षकाने प्रोत्साहन द्यायला हवे. शब्दांशी खेळत वेगवेगळी वाक्ये मुलांनी बनवली आणि वाचली तर वाचन शिकण्याच्या प्रक्रियेला मदत होते.

🎍 शाळेमुळे मुलांच्या भाषाविकासाला खीळ बसण्याची खूपच शक्यता असते. मुलांची कल्पकता, शब्दांच्या रचनांच्या निवडीचे स्वातंत्र्य यांवर पुस्तकातील साचेबंद धड्यांमुळे गदा येत नाही ना हे पाहायला हवे.

📝 मुलांचा पुस्तकांशी कसा परिचय होतो हे दक्षतेने पाहायला हवे. पाठ्यपुस्तकांचा सुमार दर्जा ही खरोखर काळजी वाटण्याजोगी बाब आहे. एका बालशाळेत तर क्रमिक पुस्तके सोडून इतर पुस्तके नव्हती ! गोष्टीच्या पुस्तकांविषयी मी त्या शिक्षिकेला विचारले तेव्हा ती म्हणाली, ‘पालकांनी वाचनालयातून मुलांसाठी गोष्टीची पुस्तके आणावीत की !’ दुसर्‍या एका शाळेत वाचनाच्या क्रमिक पुस्तकांखेरीज इतर गोष्टींची पुस्तके देण्यावर मुख्याध्यापकांनी बंदी घातली होती. क्रमिक पुस्तकांचा अभ्यास झाल्यावर मगच गोष्टीची पुस्तके मुलांना दिलेली चालतील असा तिथला नियम होता ! शिक्षिका चोरून मुलांना गोष्टीची पुस्तके देत असे.

🌅 एक चित्र आणि त्यासोबत एक शब्द अशी पुस्तके ठोकळेबाज असतात. अवतीभवती काय घडते, माणसे काय करतात, कसे करतात हे पाहणे, त्यांची नक्कल करणे, त्याविषयी बोलणे हे करायला मुलांना आवडते. त्यामुळे मुलांच्या बोलण्यावर आधारित मुलांची पुस्तके बनणे महत्त्वाचे आहे.

🏡 पुष्कळ वर्गांमध्ये मी ते बघितले मुलांनी स्वतःची वाक्ये तर त्या पुस्तकांत लिहिली होतीच, शिवाय इतर मुलांना उपयोगी पडतील अशीही पुस्तके मुलांनी लिहिली होती. पुस्तक ही इतर कोणीतरी तुमच्यासाठी केलेली गोष्ट असा मर्यादित अर्थ ओलांडून मग ती तुम्ही इतरांसाठी बनवलेली गोष्ट असा व्यापक अर्थ पुस्तकाला मिळतो.

🔮 न्यूहॅमच्या एका शाळेत ‘रंगारी’ या विषयावर एक पुस्तक मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून बनवले होते. त्यातली चित्रे मुलांनी आणि शिक्षकांनीच काढली होती आणि मुलांचे शब्द शिक्षकांनी लिहिले होते. छानदार बांधणी करून पुस्तकांच्या मांडणीवर ते ठेवलेले होते. त्यातला मजकूर असा होता :

👉🏻 शाळेत रंगकाम चालू आहे.

👉🏻 मैदानात रंगार्‍यांची गाडी आहे.

👉🏻 ते आठवा वर्ग रंगवत आहे.

👉🏻 छत रंगवताना ते बांबूच्या पहाडावर चढतात.

👉🏻 एक रंगारी भिंत रंगवण्यासाठी शिडीवर चढला आहे.

👉🏻 छताला त्यांनी पांढरा रंग दिला आहे, भिंतीला केशरी.

📚 हे दिसायला सरळसाधे दिसले, तरी अशी मुलांची पुस्तके बनवणे सर्वत्र रुळलेले नाही. एवढेच नाही तर मुलांच्या पुस्तकांना छापील पुस्तकांच्या तोलामोलाचे स्थानही पुष्कळ ठिकाणी दिले जात नाही. दुर्दैवाने बर्‍याचशा शाळा फक्त क्रमिक पुस्तकांवरच अवलंबून राहतात.

📚 क्रमिक पुस्तकांवरून मुलांची पुस्तकाबाबतची संकल्पना आकाराला येते.

📚 ज्या शाळा क्रमिक पुस्तकांपाशी अडकून रहात नाहीत, त्या मुलांची भाषिक अभिव्यक्ति वैविध्याने बहरते. उदाहरणार्थ –

👉🏻मी माझ्या कोंबडीला तीन अस्वलांची गोष्ट सांगतेय – 🙎अ‍ॅन, ५ वर्षे

👉🏻अ‍ॅलेक्स लेडीबर्ड किड्याच्या मागोमाग जंगलात घुसतोय.
🙎कॅरल, ६ वर्षे

👉🏻माझा मित्र आणि मी बोटीतून मासेमारील निघालोय, मी नांगर टाकलाय.
🙇 – अ‍ॅलेक्स ६ वर्षे

👉🏻 मी चर्चला चाललेय् आणि मला चर्चच्या घंटा ऐकू येतायत.

🌅 स्वतःच्या चित्रांसोबत मुलांनी या ओळी लिहिल्या आहेत. या शाळेत मुलांना वाचायला शिकवण्यासाठी, त्यांच्याच बोलण्याचा आशय वापरला जातो. बाकी कोणतीही साधने वापरली जात नाहीत, मुलांना खूप वेगवेगळ्या कृती मात्र करायला मिळतात.  स्वयंपाक, पक्षी पाळणे, बागकाम, रस वाटेल अशा गणिती कृती वगैरे.

 🎑 या शाळेत गोष्टी सांगण्याला खूप महत्त्व होतं. गोष्टींची निवड काळजीपूर्वक केली जात होती. गोष्टींची पुस्तके मांडून ठेवली होती. बोलायला आणि वाचायला त्यातून सहज चालना मिळत होती.

📓 पुस्तकांची भाषा अशी हवी, की त्यात लोककथांप्रमाणे पुनरावृत्ती तर आहेच. पण त्याबरोबर उत्कंठाही वाढते आहे. ती पुनरावृत्ती कंटाळवाणी नाही. पुस्तक वाचणे ही मुलांना आपलीशी वाटणारी गोष्ट असायला हवी. कुणाबरोबर तरी एकत्र बसून वाचणे, वाचून दाखवलेले ऐकणे ही भावपूर्ण गोष्ट असते. हजारो वेळा केलेला शब्दांचा सराव या भावपूर्ण गोष्टीची जागा घेऊ शकत नाही !

🔅📙 अर्थातच, या सर्वांत, महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे पुस्तकांची उपलब्धता. असंख्य मुलांसाठी अशी जागा म्हणजे शाळा. विचारपूर्वक निवडलेली, मांडलेली, रंगीत चित्रे असलेली पुस्तके शाळेत असायला हवीत. ती कुलूपबंद नसायला हवीत. खोलीभर कपाटातल्या बंद करून ठेवलेल्या पुस्तकांपेक्षा वर्गातल्याच कोपर्‍यात खुल्या मांडणीवर असणार्‍या पाचपंधरा पुस्तकांचे मोल नक्कीच जास्त आहे.

🔏 अशा छोटाश्या कोपर्‍यातली पुस्तके निवडून, हाताळून, चाळून, त्यातल्या पुस्तकांवर बोलणारी मुले मी वर्गांमध्ये पाहिली आहेत. या मुलांचे पुस्तकांशी नाते जुळते.

⌛ वाचायला शिकणार्‍या मुलांपैकी फारच थोडी मुले पुढे चांगले वाचक बनतात. आपण जेव्हा असे म्हणतो, की मुलांनी वाचायला हवे, तेव्हा आपण स्वतःलाच अनेक प्रश्न विचारायला हवेत. मुलांनी काय वाचायचे ? पुस्तकांत मुलांसाठी असते तरी काय ? मुलांचे आणि पुस्तकांचे काय नाते ? पुस्तकांत असे काय असते, की जे इतर गोष्टींमधून मिळू शकणार नाही ? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली, तर वाचन शिकण्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यांकडे बघण्याची निराळी नजर आपल्याला लाभेल.
💎💎💎💎💎💎💎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा